सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने राजा शिवछत्रपती परिवार ही गडकिल्ले संवर्धन संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या या संस्थेच्या वतीने रत्नागिरी विभागाच्या माध्यमातून २ फेब्रुवारी २०२५ रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत गडावरील वाढलेले गवत तसेच खुरटी झाडे आणि झुडुपे काढून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेसोबतच गडाच्या परिसरात शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला.
या उपक्रमात रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणांहून आलेल्या बहुसंख्य मावळ्यांनी आणि रणरागिणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांची शिवप्रतिष्ठेची जाणीव आणि गडकिल्ल्यांप्रती निष्ठा या माध्यमातून प्रकर्षाने दिसून आली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी श्री. दिनेश कुर्टे, अलंकार मयेकर, गौरव सुर्वे, अरुण मोरे, राजेश शिंदे तसेच परिवारातील मावळ्यांनी खूप मेहनत घेतली.
शिवकार्याची परंपरा – प्रत्येक महिन्यातील एक रविवार गडकिल्ल्यांसाठी!
राजा शिवछत्रपती परिवार संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्यातील एक रविवार शिवकार्याला समर्पित करण्यात येतो. या दिवशी विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, देखभाल, संवर्धन तसेच इतिहासाबाबत जनजागृती केली जाते.
शिवकार्याचा भाग व्हा!
जर कोणाला या शिवकार्यात सहभागी व्हायचे असेल, अथवा किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेत योगदान द्यायचे असेल, तर त्यांनी रत्नागिरी विभाग प्रमुख श्री. दिनेश कुर्टे (7385223069) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.