दिल्ली:- कोकण रेल्वेने आपल्या उल्लेखनीय कार्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. गव्हर्नन्स नाऊ यांच्या वतीने दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात “लीडरशिप अवॉर्ड” आणि “इन्फ्रास्ट्रक्चर लीडरशिप अवॉर्ड” या दोन प्रतिष्ठित सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आले.
गव्हर्नन्स नाऊतर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या अकराव्या गव्हर्नन्स नाऊ पुरस्कार सोहळ्यात कोकण रेल्वेची निवड करण्यात आली.
कोळसा आणि खाण राज्यमंत्री मा. श्री. सतीश चंद्र दुबे आणि माजी खासदार मा. श्री. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते कोकण रेल्वेला हे सन्मान प्रदान करण्यात आले. कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा आणि वर्क्स डायरेक्टर श्री. आर. के. हेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या विशेष क्षणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या विकास आणि नवकल्पनांना मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे रेल्वे क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे.