खेड:- तालुक्यातील आयनी मेटे मोहल्ल्यातील मारहाणीत तीनजण जखमी झाले आहेत. ही मारहाणीची घटना २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भागोजी जाधव (४४), लक्ष्मी प्रकाश जाधव (४०) व दिप्ती प्रकाश जाधव (तीनही रा. आयनी मेटे मोहल्ला, ता. खेड) अशी या तीन जखमींची नावे आहेत. या घटनेची फिर्याद २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १:११ वाजता दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रथमेश एकनाथ जाधव (रा. आयनी मेटे मोहल्ला, ता. खेड) व इतर १२ ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी टी. व्ही. बघत असताना फिर्यादी यांचा चुलत भाऊ आरोपी प्रथमेश एकनाथ जाधव व अन्य १२ ते १५ अनोळखी व्यक्ती हे फिर्यादी यांच्या घरावर दगडी मारत होते, म्हणून फिर्यादी यांच्या पत्नीने पुढे जावून दरवाजा उघडून पाहिले असता आरोपी प्रथमेश जाधव याच्या हातात बांबू व त्याच्या सोबतच्या अन्य १२ ते १५ अनोळखी व्यक्ती हे फिर्यादी यांच्या घरात हातामध्ये हॉकी स्टीक घेऊन शिरले. फिर्यादी यांच्या डोक्यात, उजव्या पायावर आरोपी प्रथमेश जाधव याने बांबूने व त्याच्या मित्रांनी हातातील हॉकी स्टीकने मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.