रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचा आणि वीरतेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये सध्या हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारे आहे.
बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा रयत क्रांती संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष आरावकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. अशा घटना समाजात अस्वस्थता पसरवणा-या असून त्या कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही असे श्री. आरावकर यांनी सांगितले.
रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासोबत झालेल्या भेटीवेळी श्री. आरावकर यांनी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाकडे हत्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशा गंभीर गुन्हयांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगतीने न्यायप्रक्रियेव्दारे फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीने तपास करावा जेणेकरून समाजात कायदा सुव्यवस्था राखली जात असल्याचे ठाम संदेश जनतेमध्ये जाईल, अशी मागणी केली.
रयत क्रांती संघटना व संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी या प्रकारच्या घटनांचा ठाम विरोध केला आहे. तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटीबध्द असल्याचे सांगितले. आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुन्हा एकदा शांतता आणि न्याय प्रेमी राज्य बनवूया असे आवाहन श्री. आरावकर यांनी केले.