रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रे भाड्याच्या जागेत कार्यरत.

0
32

रत्नागिरी (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी उभारण्यात आलेली उपकेंद्रे अद्याप स्वत:च्या जागेअभावी भाड्याच्या जागेतून सेवा देत आहेत. जिल्ह्यात सध्या १०१ उपकेंद्रे भाड्याच्या जागेत कार्यरत असून, या केंद्रांसाठी हक्काची जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामीण भागातील ही आरोग्य उपकेंद्रे गरजू आणि गरीब रुग्णांसाठी जीवनदायी ठरतात. किरकोळ उपचारांसाठी ही उपकेंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अनेक वर्षांपासून हंगामी स्वरूपात सेवा देणाऱ्या या केंद्रांसाठी कोणीही जमीन दान देण्यास पुढे येत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मंजूर ३७८ आरोग्य उपकेंद्रांपैकी २१८ उपकेंद्रांना स्वत:च्या इमारती उपलब्ध आहेत. मात्र, उर्वरित १०१ उपकेंद्रांसाठी जमीन उपलब्ध न झाल्याने इमारत उभारणी रखडली आहे. शासनाकडून जमीन खरेदीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी कमीतकमी ५ गुंठे जमीन आवश्यक आहे. विनामूल्य जमीन मिळाल्यास आणि जागेचे बक्षीसपत्र तयार केल्यानंतरच इमारत उभारणी शक्य होते. जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे कोणीही जमीन दान करण्यास पुढे येत नसल्याने उपकेंद्रांसाठी हक्काची जागा मिळवणे आव्हान ठरत आहे.

सध्या १७ उपकेंद्रांना दानशूर नागरिक व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जमीन उपलब्ध झाली आहे, आणि त्याठिकाणी इमारत बांधकामाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. तथापि, उर्वरित केंद्रांसाठी जागेच्या शोधाची गरज अद्याप कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here