शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबई:- मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊतांनी घणाघाती टीका केली. “माफी मागून असे विषय सुटतात का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी आपटे असले तरी मुख्य आरोपी त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत काय म्हणाले?
“खरं म्हणजे दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा आम्हाला दुर्देवाने पाहायला मिळतोय. लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर झालेला आहे. महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे. आता राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. इतकं होऊन देखील हे राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कारण यामध्ये आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपआपल्या माणसांना आणि ठेकेदांना काम देऊन सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. तेथील आसपासच्या घरांची कौलं पडली नाहीत. मग पुतळा कसा पडला?”, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.