लांजा:- मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर यांच्या वतीने सोमवार, दि. 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत सिनिअर कॉलेज लांजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येत या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेने मागील आठ वर्षांपासून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून तालुक्यात सामाजिक ऋणानुबंध जपले आहेत. यावर्षीचे रक्तदान शिबिर राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मोठे योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित केले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी आणि संजीवनी केंद्र कोल्हापूर यांच्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा उद्देश
राज्यभर रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्याची कमतरता भासते. रस्ते अपघात, ग्रामीण भागातील आरोग्य समस्या आणि गंभीर परिस्थितीत रक्ताची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी गणेश खानविलकर (ग्रामीण उपाध्यक्ष): 9403576382, रविंद्र कांबळे (लांजा विभाग): 7875111950, श्रीकांत मटकर (राजापूर विभाग): 8007200561 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे.
मुचकुंदी परिसर विकास संघाबद्दल…
जात-पात आणि राजकारण विरहित या संघटनेने आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यटन यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी काम केले आहे. समाजसेवेची ही परंपरा कायम राखत यावर्षी देखील रक्तदान शिबिरातून “रक्ताचं आणि आपलेपणाचं नातं” जपले जात आहे.