रत्नागिरी प्रतिनिधी | 3 फेब्रुवारी 2025
देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी भेंडीचा माळ येथे एका पाच महिन्याच्या बालकाचा तापामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३१ जानेवारी रोजी घडली. मयुरेश जणू जांगळी असे त्या बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयुरेशला ताप आल्याने त्याच्या कुटुंबियांनी तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठवले. रत्नागिरीतही प्रकृती खालावत गेल्याने त्याला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
रुग्णवाहिकेतून कोल्हापूरकडे जात असताना मयुरेशची प्रकृती आणखी खालावली, त्यामुळे रुग्णवाहिका परत रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे जांगळी कुटुंबीयांवर आणि संपूर्ण मुर्शी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.