रत्नागिरी:- खेड तालुक्यातील भरणे (बाईतवाडी) येथील श्री. आत्माराम धोंडु शिगवण यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीतून विनापरवानगी आमदार निधीतून सुरू असलेल्या रस्ते आणि गटार बांधकामाला विरोध दर्शवून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दि. २६ जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू केले होते.

श्री. शिगवण यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या गट क्र. २५२ व २५३ या जमिनीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले जात आहे. शेजारील जमिनमालक आणि राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात असून, संबंधित प्रकरणी त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जासोबत जोडण्यात आली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, त्यांच्या परवानगीशिवाय आणि ग्रामपंचायतीने जागा वर्ग न करताही शासकीय निधीतून रस्ता व गटार बांधकाम करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने सदर प्रकल्पाला ना हरकत दाखवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बांधकामामुळे जमिनमालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे.


श्री. शिगवण यांनी त्यांच्या अर्जात मागणी केली आहे की, त्वरित हे काम थांबवले जावे, बांधकामासाठी खर्च केलेला निधी ठेकेदाराला देऊ नये आणि अतिक्रमण हटवले जावे. त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्यास ते उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात 5 दिवसाची मुदत दिली असून चौकशी करून कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन श्री. शिगवण यांना प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

