रत्नागिरी:- जिल्ह्यात १८५ ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून ३३६ उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. या नवीन ग्रामसेवकांना येत्या १५ दिवसांत नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, ६४८ ग्रामसेवकांची, तर १२७ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ग्रामसेवकांची २०९, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून करण्यात येत आहे.
गेली काही वर्षे रखडलेली ग्रामसेवकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १८५ पदे भरण्यात येणार आहेत. या १८५ जागांसाठी राज्यभरातून तब्बल ४१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर ग्रामसेवक भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. गेले दोन दिवस ग्रामसेवक पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी जिल्हा परिषदेच्या आवारातील लोकनेते शामरावजी पेजे सभागृहात सुरू होती. ही छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. लवकरच या भरतीमध्ये निवड झालेल्या १८५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांच्या रिक्त पदांचा आलेख कमी होणार आहे. तसेच ग्रामसेवकांवरील अतिरिक्त भारही कमी होणार आहे.
एका ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपंचायतींचा पदभार
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची २०९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपंचायतींचा पदभार आहे. पदभारामुळे त्या ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. ही रिक्त पदे भरण्यात येत असल्याने ग्रामसेवकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.