भाजपची प्राथमिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट गांभिर्याने पूर्ण करा – आमदार रविंद्र चव्हाण.

0
34

विजय मिळवण्यासाठी दिला मंत्र.

रत्नागिरी:- जिल्ह्यात भाजप प्राथमिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवता येईल. परंतु त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, व्यक्तीप्रेम ठेवू नका. पक्षाच्या विचारधारेसोबत राहा. राष्ट्र प्रथम या हेतूने कार्यरत राहा. देश सक्षम करण्यासाठी भाजपची विचारधाराच महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनी गांभिर्याने, जबाबदारीने नोंदणी करावी. आपल्याला नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत आहे, असे प्रतिपादन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले.

दक्षिण व उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपची कार्यशाळा आज बंदर रोड येथील कित्ते भंडारी सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, डॉ. विनय नातू, प्रमोद जठार, अॅड. बाबा परुळेकर, अॅड. विलास पाटणे, सतेज नलावडे, शिल्पा मराठे, वर्षा ढेकणे, स्नेहा चव्हाण, पल्लवी पाटील, राजेंद्र फाळके, डॉ. ऋषिकेश केळकर, सचिन वहाळकर, यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष, विधानसभा प्रमुख, तालुकाध्यक्ष, मोर्चा, प्रकोष्ठप्रमुख, शहराध्यक्ष उपस्थित होते. सुरवातीला शिवछत्रपती आणि भारतरत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अटलजी नावाचे पुस्तक देऊन रविंद्र चव्हाण यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सावंत यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यात एकही जि. प. चा सदस्य विजयी झाला नाही. आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपली प्राथमिक सदस्य नोंदणी मोठ्या संख्येने व्हायला हवी. दिलेले उद्दिष्ट प्रत्येकाने पूर्ण करा. प्रत्येक घरात पोहोचा. पक्षाबद्दल बांधिलकी ठेवा. आपुलकी ठेवा, बघा काय फरक पडतो. राष्ट्र प्रथम हे आपण सांगितले पाहिजे. राज्यात दीड कोटी नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. रत्नागिरी जिल्हा भाजपसाठी सुपिक आहे. त्यामुळे नोंदणी व्हायला हवी. सोशल मिडीयावर जास्त न खेळता लोकांमध्ये जाऊन बोला, अशा सूचना रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नोंदणीबद्दल थोडक्यात माहिती दिली. जिल्हा परिषद गटांत बैठका झाल्या. ऑनलाइनही बैठका झाल्या. परंतु अजून नोंदणी समाधानकारक झालेली नाही. सर्व निवडणुका आपण स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे नोंदणी करणे अत्यावश्यक आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ५० हजार सभासदांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरीत स्मारक होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला होकार दिला आहे. त्याकरिता स्मारक समिती स्थापन करावी. अटलजींचे चरित्र, कविता आपण लोकांसमोर सादर केले जाणार आहेत. त्याचे जतन करून भविष्यातील पिढीसाठी आदर्शदायी वास्तू तयार होवो, ती पाहण्यासाठी पर्यटकही येतील, असे राजेश सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here