मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला असताना, विधानसभा निवडणुकीत त्यांना ४३ जागा कशा मिळाल्या? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ईव्हीएमवरही प्रश्नचिन्ह लावले आहे.
मनसेच्या जाहीर मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीनंतर राज्यात इतका सन्नाटा कधीच नव्हता. निकालानंतर जो जल्लोष व्हायला हवा होता, तो कुठेही दिसला नाही.” तसेच, निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याने अनेकांनी शंका उपस्थित केल्या असून, काही उमेदवारांनी तर पुन्हा मतमोजणीसाठी पैसे भरल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबाबतही प्रश्न विचारला. सात वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले थोरात या वेळी अवघ्या १० हजार मतांनी कसे पराभूत झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या वाढलेल्या जागांवर भाष्य करताना ते म्हणाले, “गेल्या वेळी भाजपला १०५ जागा मिळाल्या होत्या, यावेळी १३२ जागा मिळाल्या. पण अजित पवार यांच्या पक्षाला लोकसभेत केवळ एक जागा मिळत असताना विधानसभेत ४३ जागा कशा मिळाल्या? शरद पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळतात, तर काँग्रेसच्या १३ खासदारांच्या तुलनेतही आमदारसंख्या कमी दिसते. हा सगळा निवडणूक निकाल संशोधनाचा विषय आहे.”
शेवटी, अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या लढवण्यापेक्षा न लढवलेल्याच बऱ्या, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.