महाराष्ट्र:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करणे हा भाषिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अयोग्य शब्दप्रयोग असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये “शिवजयंती दिनी श्रद्धांजली” असा उल्लेख केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला असून, इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट सवाल केला – “जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?” जयंती हा प्रेरणा घेण्याचा आणि उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो. त्यामुळे अशा वेळी ‘श्रद्धांजली’ हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून शब्दांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
राहुल गांधी यांच्या या शब्दप्रयोगावर भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका करत म्हटले, “राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना भारतीय संस्कृतीचा अजिबात अभ्यास नाही. त्यामुळे काँग्रेसने या वक्तव्याबद्दल माफी मागावी.”
तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही राहुल गांधींना लक्ष्य करत, “गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेस विषयीच बोलावं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्यासाठी त्यांना कोणताही अधिकार नाही,” असे स्पष्ट केले.
सामान्य शिवभक्तांमध्ये संतापाची भावना
या प्रकरणानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवजयंती हा महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याचा दिवस आहे, श्रद्धांजली वाहण्याचा दिवस नव्हे, असा ठाम सूर उमटत आहे. यावर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
राहुल गांधी यांच्या या विधानावर काँग्रेस स्पष्टीकरण देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.