संगमेश्वर स्थानकावर प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण; संगमेश्वर स्थानकावर अद्याप 3 एक्सप्रेस गाड्यांना रेल्वे थांबा न मिळाल्याने जनतेच्या तीव्र भावना.

0
22

संगमेश्वर:- मडगाव, जामनगर, आणि पोरबंदर एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, या मागणीसाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे. या उपोषणाला संगमेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, राजकीय, सामाजिक संघटना, रिक्षा आणि व्यापारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

ग्रुपचे प्रमुख व पत्रकार संदेश झिमण यांनी सांगितले की, “कोकण रेल्वेने वेळोवेळी आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला. आता जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे.”

मागील प्रयत्नांमध्ये फसलेली आश्वासने

२३ जुलै २०२४ रोजी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार शेखर निकम आणि निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर ग्रुपच्या सदस्यांनी गाड्यांच्या थांब्याबाबत मागणी केली होती. सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता, मात्र सहा महिन्यांनंतरही अपेक्षित निर्णय झाला नाही. उलट पत्राद्वारे मागणी फेटाळण्यात आली.

संगमेश्वर तालुक्यावर अन्याय

दरवर्षी कोकण रेल्वेच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातून करोडो रुपयांची उलाढाल होते. तरीही तालुक्यातील जनतेला गाड्यांचा थांबा मिळत नाही, हा गंभीर अन्याय आहे. सद्यस्थितीत या तीन गाड्या दिवसा प्रवासासाठी अतिशय सोयीच्या ठरतील. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यास टाळाटाळ केली आहे.

आंदोलनाचा वाढता पाठिंबा

या आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून प्रजासत्ताक दिनी रेल्वे प्रशासनावर मोठा दबाव येण्याची शक्यता आहे. संदेश झिमण म्हणाले, “आंदोलन संविधान आणि कायद्याचा सन्मान राखून केले जाईल. परंतु जर कोणी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर असेल.”

हक्कांसाठीचा लढा

“हा लढा सामान्य जनतेच्या प्रवास हक्कासाठी आहे. कोकण रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” असे झिमण यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here