मालवण | प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज शांततेने व सुसंवादाने राहत असताना काही ठिकाणी ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. आचरा, मालवण आणि इतर भागांमध्ये अशा प्रकरणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास प्रक्रियेत विलंब होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलीस तपास अधिक जलद आणि प्रभावी व्हावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
जिल्हा मंत्री संतोष प्रभू यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या वतीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना यासंबंधी निवेदन देण्यात आलं. मालवणमध्ये पदाधिकारी विलास हडकर आणि भाऊ सामंत यांनी याबाबत माहिती दिली.
निवेदनात म्हटलं आहे की, देशविघातक घटकांकडून राष्ट्राच्या स्थैर्यावर गालबोट लावणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत. शासनाने वेळोवेळी यासंबंधी माहिती दिलेली आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘व्यापार जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’ यांसारख्या प्रकारांची योजना मुस्लिम समाजातील काही लोकांमार्फत होत असल्याचे दिसून येते.
मालवण आणि आचरा पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांत अशा काही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तपासात अपेक्षित गती दिसून येत नाही. त्यामुळे समाजात पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत आहे. म्हणूनच या प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
विलास हडकर यांनी स्पष्ट केलं की, दोषी व्यक्तींविरोधात तात्काळ आणि कठोर पावले उचलली नाहीत, तर अशा घटनांचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे पोलिसांनी कठोर आणि प्रभावी पावलं उचलून समाजात कायद्याचा धाक निर्माण करावा.