रत्नागिरी:- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरतर्फे आयोजित जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा 28 ते 30 डिसेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातून 700 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
एसआरके तायक्वांदो क्लबच्या सुवर्णकन्या स्वरा साखळकरने या स्पर्धेत विशेष ठसा उमटवत तिहेरी सुवर्ण कामगिरी केली. क्युरोगी प्रकारात अंडर 37 किलो वजनी गटात आणि 148 सेमी उंची गटात तिने सुवर्णपदके जिंकली.
पुमसे ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदु
कॅडेट गटातील फ्री स्टाईल पुमसे प्रकारात स्वराने 5.78 या सर्वोच्च स्कोरसह तिसरे सुवर्णपदक मिळवले. तिच्या पुमसेने पंच, प्रशिक्षक, पालकवर्ग, आणि खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले.
स्वराच्या या कामगिरीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, प्रशिक्षक प्रशांत आणि मिलिंद भागवत, तसेच क्लबच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले.
स्वराला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सहावी इयत्तेत शिकणारी स्वरा दामले शाळेची विद्यार्थिनी असून तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.