राजापूर:- राजापूर तालुक्यातील धोपेश्वर पन्हळे येथे सुरू असलेल्या अनधिकृत मदरशाविरोधातील आमरण साखळी उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर गुरुवारी स्थगित करण्यात आले. तहसीलदार विकास गंबरे यांनी दिलेल्या पत्रानुसार मदरशातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले असून, इमारतीचा अनधिकृत वापर थांबविण्यात आला आहे.
ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते अमोल सोगम व स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. तथापि, संबंधित इमारत पाडण्याच्या मागणीसाठी संघर्ष सुरू राहील, असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी स्पष्ट केले.
सदर उपोषणाला विविध हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. पाच दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर प्रशासनाने स्थळाची तपासणी करून शिक्षण विभागाच्या माध्यमातून नोटीस बजावली होती. तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर तहसीलदार कार्यालय परिसरातील श्री महापुरुष मंदिरात महाआरती करून उपोषणाची सांगता करण्यात आली. या वेळी स्थानिक पदाधिकारी, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क होते आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.