रत्नागिरी (प्रतिनिधी): संगीत रसिकांना शास्त्रीय संगीतातील अप्रतिम मेजवानी देणारा आर्ट सर्कल आयोजित संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून थिबा राजवाडा परिसरात रंगणार आहे.
महोत्सवाचा प्रारंभ बंगलोरचे सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ बेलामनु यांच्या सुमधुर कर्नाटक व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादरीकरणाने होणार आहे. सिद्धार्थ यांना संवादिनीवर वरद सोहनी व तबल्यावर प्रणव गुरव साथ करणार आहेत. उद्घाटनाच्या सत्राचा समारोप संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांच्या वादनाने होईल, ज्यांना तबल्यावर रामदास पळसुले साथ करतील.
२५ जानेवारीला सायंकाळी व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर व बासरी वादक एस. आकाश सहवादनाने सत्राची सुरुवात करतील. त्यांना पखवाजावर प्रथमेश तारळकर आणि तबल्यावर विवेक पंड्या साथ करतील. दुसऱ्या दिवसाचा समारोप विदुषी भारती प्रताप यांच्या सुमधुर गायनाने होणार आहे. भारती यांना संवादिनीवर पं. अजय जोगळेकर व तबल्यावर योगीश भट साथ करतील.
२६ जानेवारीला महोत्सवाचा शेवटचा दिवस तबला वादक पं. योगेश समसी यांच्या तबला सोलोने सुरू होईल. त्यांना संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी लेहरासाथ करतील. महोत्सवाचा समारोप पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या मनमोहक गायनाने होईल. त्यांना तबल्यावर यशवंत वैष्णव व संवादिनीवर अजय जोगळेकर साथ करतील.
आर्ट सर्कल फाउंडेशनने संगीतप्रेमींना महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.