गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

0
34

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि सारस्वत चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने नवउद्योजक विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता सेमिनार हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक श्री. आशिष मोंडकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, “विक्रीसाठी प्रोडक्टची स्टोरी अतिशय रंजक पद्धतीने ग्राहकाकडे पोहोचवणे आवश्यक आहे.” तसेच, ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे हा यशस्वी व्यवसायाचा मुख्य गाभा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

श्री. आशिष मोंडकर हे युनिटॉप अक्वाकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असून, त्यांनी १९९८ पासून कौटुंबिक व्यवसायात प्रवेश करत कंपनीच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः टेक्सटाईल, डिटर्जंट आणि केमिकल इंडस्ट्रीसाठी प्रक्रियात्मक उपकरणांच्या उत्पादनात त्यांचा विशेष अनुभव आहे. २००३ मध्ये त्यांनी वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, रिव्हर्स ऑस्मोसिस आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा विकसित करत व्यवसायाचे नव्याने विस्तारीकरण केले.

कार्यक्रमादरम्यान ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत आंत्रप्रेन्योर्स (GCSE) च्या नवीन संचालकपदी श्री. आशिष मोंडकर यांची नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. GCSE चे संस्थापक श्री. सिद्धार्थ सिनकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांसोबत आपले व्यावसायिक अनुभव आणि संघर्षाच्या कहाण्या शेअर केल्या. तसेच, पुढील मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांनी आपले बिझनेस आयडिया सादर करण्याचे आणि त्यावर चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हा प्रेरणादायी कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि विद्यार्थी नवउद्योजक क्लबचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, डॉ. मिनल खांडके, प्रा. हरेश केळकर आणि प्रा. नीता खामकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद आंबेकर यांनी केले.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, “व्यवसाय करताना संपूर्ण ज्ञान आणि माहिती असणे आवश्यक असते. अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जागरूकता निर्माण होईल.” कार्यक्रमाला विशेष उपस्थिती उद्योजक श्री. मनोज तेंडुलकर आणि श्री. आजगावकर यांनी दर्शवली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला, ज्यामुळे भविष्यातील नवउद्योजक घडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा महाविद्यालयाने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here