जांभुळवाडी ग्राम विकास मंडळाचा “संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी थांबा” आंदोलनास पाठिंबा.

0
40

मुंबई:-संगमेश्वर तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या रेल्वे स्थानकांवर गाड्यांचे थांबे मिळावेत, या मागणीसाठी “निसर्गरम्य संगमेश्वर व निसर्गरम्य चिपळूण” या फेसबुक ग्रुपच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी २०२५ रोजी संगमेश्वर स्थानकात सनदशीर मार्गाने लाक्षणिक उपोषण होणार आहे. या उपोषणास जांभुळवाडी ग्राम विकास मंडळ, मुंबईने पाठिंबा दिला आहे.

मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष धाडवे व सचिव श्री. सचिन बोले यांनी श्री. संदेश जिमन यांना पाठिंब्याचे पत्र पाठवले. पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, मडगाव एक्सप्रेस, जामनगर एक्सप्रेस, पोरबंदर एक्सप्रेस या गाड्यांचे संगमेश्वर स्थानकावर थांबे मिळाल्यास तालुक्यातील प्रवाशांची मोठी सोय होईल. तसेच, या थांब्यांमुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

संगमेश्वर रेल्वे स्थानक तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ग्रामस्थ प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे वरील गाड्यांचे थांबे मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. धाडवे म्हणाले, “ही मागणी फक्त संगमेश्वरच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांसाठीही लाभदायक ठरेल. रेल्वे प्रशासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा.” सचिव श्री. बोले यांनी देखील आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आणि मंडळाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

“निसर्गरम्य संगमेश्वर व निसर्गरम्य चिपळूण” ग्रुपचे प्रतिनिधी श्री. संदेश जिमन यांनी या आंदोलनाच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “या उपोषणाचा उद्देश संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे स्थानकाला प्राधान्य मिळवून प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढवणे हा आहे.”

आंदोलनाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here