रत्नागिरी | प्रतिनिधी
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरी संचलित जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका (वाचनालय) येथील मार्गदर्शक आणि माजी विद्यार्थी रितेश चव्हाण यांची जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागात ग्राम आरोग्य निरीक्षक पदावर निवड झाली आहे.
रितेश चव्हाण यांचे मूळ गाव ओळी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी आहे. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण कै. गोदुताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी, बारावीपर्यंतचे शिक्षण अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज, आणि पदवी शिक्षण गोगटे कॉलेजमध्ये बीएससी मॅथेमॅटिक्स पूर्ण केले आहे. गणित विषयाची आवड असल्याने त्यांनी जिजाऊ संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये गणित व बुद्धिमत्ता विषयाचे मार्गदर्शन केले असून, सध्या ते पोलीस भरती आणि सरळ सेवा वर्गांमध्ये अध्यापन करत आहेत.
जिजाऊ वाचनालय, रत्नागिरीतील कुणबी भवन येथे 2015 पासून कार्यरत असून, या उपक्रमाचा अनेक स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. रितेश चव्हाण यांनी शिक्षक व विद्यार्थी या दुहेरी भूमिकेत संस्थेमध्ये सक्रिय सहभाग दिला आहे.
त्यांच्या यशाबद्दल संस्थापक निलेश सांबरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर, सचिव केदार चव्हाण, तालुकाध्यक्ष मंदार नैकर आणि प्रकल्प संचालक संदीप पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.