रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागातील दोन संगणक चोरीला गेले असून, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जिल्हा परिषदेच्या इमारतीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, ही यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने चोरीच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे.
पशु संवर्धन विभागातील लाखो रुपये किमतीचे अत्याधुनिक संगणक चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेच्या इमारतीत कामासाठी बाहेरील व्यक्तींचा वावर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्य गेटसह परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले आहे.
शासन शाळांपासून जिल्हा परिषदांपर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असताना जिल्हा परिषदेतील कॅमेरे बंद असल्याचे कारण चर्चेचा विषय बनला आहे. आठवडाभरापूर्वी चोरीला गेलेल्या संगणकांचा तपास लागणार का, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.