सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळेत शिक्षण, क्रीडा,वक्तृत्व, गायन, वादन व व्यक्तिमत्व विकास असे विविध उपक्रम विशेष राबविवले जातात.
लांजा, रत्नागिरी: तालुक्यातील आदर्श शाळा भडे नं 1 मध्ये 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षण, क्रीडा, वक्तृत्व, गायन, वादन, संगणक प्रशिक्षण, व व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. यावेळी, विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच नृत्य, नाट्य, गायन अशा विविध कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘गणेशाला वंदन’ करत झाली. शाळेतील शिक्षकांनी अंगणवाडीतील बालचमूंना मंचावर सादरीकरणाचा आनंद मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. ‘माझ्या पप्पानी गणपती आणला’ या गाण्यावर बालचमूंनी ठेका धरून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर भारूड लोककलेतील “कुंकू घ्या कोणी काळं मणी” या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली, तर “संगीतसंत सखू” या नाटिकेने भक्तीमय वातावरण निर्माण केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून दिला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने बक्षिसांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाला सरपंच संजना बंडबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आडविलकर, पोलीस पाटील प्रशांत बोरकर, मुख्याध्यापक कुड, सहायक शिक्षक माने, दळी, खुटाळे, माजी सरपंच संजीवकुमार राऊत, ग्रामस्थ बबन तेंडुलकर, राजू लिंगायत आणि जि. प. आदर्श शाळा भडे नं 3 चे मुख्याध्यापक माने यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेला हा कार्यक्रम भडे नं 1 च्या रंगमंचावर यशस्वीरीत्या पार पडला. प्रेक्षक व मान्यवरांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.