राजकीय:- भाजपमुळे राज्याची प्रगती होत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे काय निकाल लागणार आहेत हे तुम्ही आजच दाखवून दिले आहे. जनतेची गर्दी हे सांगत आहे की, महाराष्ट्रात महायुती प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. चिमूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे की “भाजप – महायुती आहे, तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे.” असे मराठीत बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत भाष्य केले.
महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी आपल्याला शेतकरी समृद्ध करावा लागेल. आज येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. महायुती सरकारही नमो शेतकरी योजनेचा दुहेरी लाभ देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आज मी तुम्हाला काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या एका मोठ्या षडयंत्राबद्दलही इशारा देत आहे. आपल्या देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे १०% आहे. काँग्रेसला आता आदिवासी समाजाला जातींमध्ये विभागून कमकुवत करायचे आहे. आमच्या आदिवासी बांधवांची एसटी म्हणून असलेली ओळख नष्ट व्हावी, त्यांनी त्यांच्या ताकदीने निर्माण केलेली ओळख मोडीत काढावी, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.