रत्नागिरी : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये टपाल विभागातून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या निवृत्ती वेतन लाभांशी संबंधित तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या तक्रारी मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत त्यांनाच अदालतीत विचारात घेतले जाईल. मात्र, कायदेशीर प्रकरणे (कॅट/कोर्ट केस), नीतिगत प्रकरणे आणि उत्तराधिकारासंबंधी तक्रारींवर विचार केला जाणार नाही.
तक्रारदारांनी १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत विहीत प्रपत्रामध्ये अर्ज सादर करावेत. सदर मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती डाकघर अधिक्षकांनी दिली आहे.
अर्ज पाठवण्यासाठी संपर्क:
📩 ई-मेल: accts.goa@indiapost.gov.in
📍 पत्ता: महेश एन, लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी – 403001