रत्नागिरी: रत्नागिरीतील पतितपावन मंदिर हे दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधल्याचा पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलून आठवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा खोटा इतिहास शिकवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन दिले गेले असले तरी अद्याप शासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
भागोजीशेठ कीर यांचा इतिहास जाणीवपूर्वक पुसण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत भंडारी समाज व इतर समाज संघटनांनी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पतितपावन मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय मजदूर संघाच्या संघटनमंत्री संजना वाडकर यांनी भागोजीशेठ कीर यांचे दैदीप्यमान कार्य पुसले जावू नये म्हणून या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. तसेच, “हे कार्य कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा समाजाचे नसून संपूर्ण मानवजातीचे आहे. त्यामुळे सर्वांनी उपोषणात सहभागी होऊन शासनावर तात्काळ चुकीचे सुधारण्यासाठी दबाव टाकावा,” असे आवाहन केले.
या बैठकीला संत रोहिदास समाजाचे विजयशेठ खेडेकर, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, पांचाळ सुतार समाजाचे अध्यक्ष भगवान सुतार, कटबु समाजाचे अध्यक्ष बी. टी. मोरे, अण्णा लिमये, निवृत्त डिवायएसपी विलास भोसले, सुरेंद्र घुडे, मंगेश शिरधनकर, म. दा. मोरे, अँड. प्रज्ञा तिवरेकर, चंद्रहास विलणकर, मुकुंद विलणकर, राजेंद्र विलणकर, नितीन तळेकर, बाबू धामणस्कर, संजना वाडकर, राखी भोळे, दया चवंडे, वारेकर, ज्योती तोडणकर, सावली मयेकर, आदिती भाटकर, कौस्तुभ नागवेकर, परिस पाटील, दिलीप रेडकर, सिद्धेश सुर्वे, श्रेयस कीर, सदानंद मयेकर यांसह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने तातडीने योग्य ती सुधारणा करावी, अशी एकमुखी मागणी बैठकीतून करण्यात आली.
