मनोरुग्णालय मारहाण प्रकरण! नातेवाईकांचे आरोप निराधार, खोट्या आरोपांचे प्रशासनाने केले खंडन.

0
28
प्रातिनिधिक चित्र

रत्नागिरी | प्रतिनिधी:- प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे नुकतीच दोन मनोरुग्णांमध्ये धक्कादायक मारामारी झाली असून, एका रुग्णाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच मारहाण केल्याचा आरोप करत वादाला तोंड फोडले. मात्र मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सौ. संघमित्रा फुले गावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन रुग्णांमध्ये अचानक वाद उफाळून आल्याने मारामारी झाली आणि एक रुग्ण जखमी झाला. त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले, मात्र जबड्याला सूज आल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे तपासणीसाठी हलविण्यात आले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेच्या साहाय्याने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेऊन मोफत उपचार करण्यात आले. सदर रुग्ण सध्या पूर्णतः स्थिर असून जीवितास कोणताही धोका नाही.

डॉ. फुले गावडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “येथे रुग्ण अत्यंत वाईट अवस्थेत दाखल होतात, पण आमच्या उपचारांनी बरे होऊन समाधानाने घरी जातात. काश्मीर ते कन्याकुमारी, सोलापूर, गोवा, मुंबई, धारवाडहूनही रुग्ण येथे उपचारासाठी येतात. नातेवाईक खोटे आरोप करून रुग्णालयाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे मनोरुग्णालय प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना सर्व उपचार प्रक्रियेची माहिती वेळोवेळी दिली गेली आहे. मी कधीही पेशंट बेडवरून पडला अशी प्रतिक्रिया दिली नाही.”

तसेच, डेरवण रुग्णालय प्रशासनास मोफत उपचारासाठी विनंती करण्यात आली होती, जी त्वरित मान्य करण्यात आली. रुग्णालयातील प्रतिनिधींनी डेरवणमध्ये जाऊन रुग्णाच्या तब्येतीची खात्री घेतली असून रुग्ण सुखरूप आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही घटना सध्या शहरात चर्चेचा विषय बनली असून, मनोरुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने वेळेत केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट होत आहे.

📝 संपादक हृषिकेश विश्वनाथ सावंत
9145680102/8855916102
MSc Zoology, M.A. Communication & Journalism, M.A. Political Science.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here