देवरुख:- आपला पक्ष फोडला,..चिन्ह, नाव चोरले..शरद पवारांचा पक्ष फोडला.. तुम्हाला संताप कसा येत नाही…? सळसळणारे रक्त तुमचे शांत कसे झाले…? ज्या प्रमाणे आपल्याला सत्तेवरून खाली खेचण्यात आले त्याचा सूड घेण्याची ही वेळ आलेली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार महत्वाचा आहे. उठा पेटून उठा आणि प्रशांत यादव यांना हजारो मतांनी विजयी करून गद्दारांना त्यांची जागा दाखवा. अशा अत्यंत आक्रमक शब्दात शिवसेना नेते आम.भास्कर जाधव यांनी देवरुख येथील कार्यकर्ता मेळाव्यात म्हटले.
आघाडीचा भरगच्च मेळावा
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ देवरुख येथील मराठा भवनात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्या बरोबर माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, सुभाष बने, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जी.प अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, महिला आघाडीप्रमुख वेदा फडके, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख नेहा माने, तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष तसेच आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला तुफान गर्दी उसळली होती.
ते म्हणाले मी फक्त प्रशांत यादव यांच्या प्रचाराला आलेलो नाही. मी तलमळतोय, मला वेदना होत आहेत. कारण माझ्या पक्षप्रमुखांना ४० गद्दारांनी धोका दिलाय, ते भयंकर आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आलाय, तो दिवस आठवला की अंगाचा तीळ पापड होतोय, त्यामुळे फिरतोय, माझा मतदारसंघ सोडून मी वणवण फिरतोय, माझ्या विजयाची चिंता मला नाही. माझा एक एक कार्यकर्ता घरात घरात जाऊन प्रचार करतोय. पण लढतोय ते माझ्या पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी, शेवटी माझा पक्षप्रमुख माझ्यासाठी महत्वाचा आहे.
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, पाठोपाठ शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, अरे हे पाप कशासाठी केलंत.?आणि काय सांगतात, आम्ही विकासासाठी गेलो. अरे वा तुमची….कसल्या विकासाच्या गप्पा मारता, कोणाला सांगता, पण छगन भुजबळांनी स्वतः सर्व पोलखोल केली आहे. ईडी आणि सीबीआय मुळे आम्हाला भाजप बरोबर जावे लागले, अन्यथा जेलमध्ये जावे लागले असते. असे स्वतः भुजबळ बोलले. त्यामुळे गद्दारांचा खोटेपणा उघड झाला आहे. अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा थेट समाचार घेतला, त्यांचा हजारो कोटींचा विकास आणि सुरू असलेली थापेबाजी, मुस्लिम समाजाची विकासाच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक, अशी सर्व त्यांची पोलखोल करतो. त्यांचे वाभाडेच काढतो खोकेखोर गद्दारांना घरी बसल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही आणि तुम्हाला देखील शांत बसू देणार नाही. असेही आम.जाधव म्हणाले.
धमक्यांना मी भीक घालत नाही: यादव
शिवसेना नेते भास्कर जाधव आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते प्रचारात उतरल्याने काहींची आता चांगलीच गोची झाली आहे. विषारी प्रचार केला जात आहे. खोटेनाटे आरोप केले जात आहेत. इतकेच नव्हे तर आमच्या लोकांना धमक्या देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तुमच्या असल्या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही. अशा शब्दात उमेदवार प्रशांत यादव यांनी विरोधकांना थेट शब्दात सुनावले.प्रशांत यादव विजयी होणार असे बोलून किंवा घोषणा देऊन निवडणूक जिंकता येणार नाही. निवडणूक तितकी सोपी नसते. त्यासाठी तुम्हाला घराघरात जावे लागेल.
महाविकास आघाडीची भूमिका, उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय, शरद पवार साहेबांबरोबर झालेली गद्दारी हे लोकांना पटवून सांगावी लागेल. तुतारी वाजवणारा माणूस ही आपली निशाणी घराघरात पोहचवावी लागेल. त्यामुळे आता थांबू नका, तुमच्या धमन्यातील रक्त सळसळू दे, लागा कामाला आणि प्रशांत यादव यांना हजारो मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा असे आवाहन आम.भास्कर जाधवांनी उपस्थितांना केले.