१०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत होणार वेदमंत्रांचा जागर.
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान माधवराव मुळ्ये भवन येथे आयोजित केले आहे.
या संमेलनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा ४ राज्यांतील प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि वेद पाठशाळांमधील अनुभवी अध्यापक सहभागी होणार आहेत. यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा चारही वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.
संमेलनाची वैशिष्ट्ये
- वैदिक मंत्रांचा सामूहिक जागर
- वेद व वेदविज्ञान यासंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- वेदांचा प्रचार व प्रसार करण्याचा मुख्य उद्देश
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने वेदप्रेमींनी या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.