रत्नागिरी : नगरपालिकांच्या राज्य संवर्गातील अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीतील राज्य संवर्ग अधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर पालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येवून घोषणा दिल्या. जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, तसेच सेवेचे ओळखपत्र मिळावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतींमध्ये राज्य संवर्गातील सुमारे ३ हजार अधिकारी आणि सुमारे ६० हजार स्थानिक कर्मचारी वर्ग सेवेत आहेत. परंतु राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. ही जुनी पेन्शन योजना लागू करावी किंवा राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी आहे.
त्याचबरोबर सर्वसाधारण बदल्यांतील जाचक अटी वगळल्या जाव्यात, आवासीत प्रगती योजना लागू करावी, पदोन्नतीतील कोट्यामधील रिक्तपदे तात्काळ भरली जावीत, शासकीय ओळखपत्र मिळावी, सहाय्यक अनुदान महिनाभर आगावू दिले जावे, सातव्या वेतन आयोगातील फरकासह मागील महागाई भत्त्यातील फरकाची रक्कम मिळावी, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. रत्नागिरी नगरपालिकेतील राज्य संवर्गमधील अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजीही केली.
