पुणे (प्रतिनिधी): राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने विसावा सोशल फाउंडेशन आणि हिरकणी महिला विकास संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात विकास साखळकर यांना ‘महाराष्ट्र जीवन गौरव’ पुरस्कार तर त्यांची कन्या स्वरा साखळकर हिला ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकास साखळकर यांना ‘महाराष्ट्र जीवन गौरव’ पुरस्कार
विकास साखळकर गेल्या 17 वर्षांपासून नियमित रक्तदान करत असून, त्यांनी स्वतः 49 वेळा रक्तदान केले आहे. त्यापैकी 37 वेळा तातडीच्या परिस्थितीत रक्तदान केले असून 29 वेळा गर्भवती महिलांना मदतीचा हात दिला आहे. कोविड काळात त्यांनी दोन रक्तदान शिबिरे आयोजित करून 63 बाटल्या रक्त संकलित केले.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना यापूर्वी आदर्श रक्तदाता पुरस्कार (2021), डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (2022), आदर्श समाज रत्न पुरस्कार (2023), विक्रमी रक्तदाता पुरस्कार (2024), आणि समाजभूषण पुरस्कार (2024) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिला ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कार
विकास साखळकर यांची कन्या स्वरा साखळकर हिने आपल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिने आतापर्यंत 24 सुवर्ण, 16 रौप्य, आणि 12 कांस्यपदके जिंकत एकूण 52 पदके मिळवली आहेत. गोव्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत स्वराने दोन सुवर्णपदके पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
स्वरा हिला यापूर्वी ‘युथ आयडॉल’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गौरव सोहळा
पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पत्रकार भवन येथे पार पडला. कार्यक्रमात विकास साखळकर आणि स्वराचा गौरव फेम अभिनेता ध्रुव दातार, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, आणि हिरकणी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिला नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
विकास साखळकर हे चालक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तर स्वरा साखळकर ही सध्या दामले शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे.