रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठित ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. माहेर संस्थेच्या सिस्टर लुसी कुरियन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या या गौरवामुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेटींद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
पुरस्कार स्वीकारताना ॲड. महेंद्र मांडवकर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक व्यापक कार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “रत्नागिरीतील युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काळात अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे.”
या विशेष प्रसंगी जिजाऊ संस्थेतर्फे माहेर संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सत्कार समारंभात जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर यांनी माहेर संस्थेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, गेल्या 28 वर्षांपासून माहेर संस्था अनाथ, गरजू स्त्रिया, पुरुष तसेच विशेष गरजा असलेल्या लोकांसाठी अविरत सेवा देत आहेत.
ॲड. मांडवकर यांनीही 2014 पासून माहेर संस्थेशी असलेले आपले नाते व्यक्त करताना सांगितले की, “माहेरमध्ये जात, धर्म, लिंगभेद न मानता केवळ ‘माणूस’ म्हणून गरजूंना मदत केली जाते. त्यामुळेच तेथे संविधानासोबत भगवद्गीता, कुराण आणि बायबल पूजेकरिता ठेवण्यात आले आहे.”
यापुढेही माहेर संस्थेतील गरजू मुलांना जिजाऊ संस्थेच्या विविध उपक्रमांमधून आवश्यक सुविधा पुरवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीला सलाम करत सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.