संगमेश्वर:- सांगमेश्वर तालुक्यातील लोवले ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर सोनवी नदी गाळमुक्त झाली आहे. पूराचे पाणी घरात घुसणे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे, तसेच रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प होणे या समस्यांवर तोडगा म्हणून हा उपसा करण्यात आला आहे.
पूर समस्येवर उपाययोजना
सोनवी नदीला येणाऱ्या पुरामुळे लोवले गावातील अनेक घरांना हानी पोहोचत होती, तसेच देवरुख-संगमेश्वर राज्य मार्गावर पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद व्हायचा. यामुळे लोवले ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदन देऊन गाळ उपशाची मागणी केली होती.
गाळ उपशाचे कार्य पूर्ण
पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून म्हारकरी, सार्वजनिक विहीर, व्हावट, ग्रामपंचायत ऑफिस आणि लोवले येथील रस्त्याच्या मोरीजवळील भागात गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये सोनवी नदीसह तिच्या अंतर्गत येणाऱ्या ओढ्यांमधील १३५० मीटर क्षेत्रातील गाळ उपसा करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक
या यशस्वी मोहिमेत ग्रामपंचायत सरपंच ऋतुजा कदम, ग्रामसेवक अभिनंदन पाताडे, तसेच ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हे काम शक्य झाले.
ग्रामस्थांमध्ये समाधान
सोनवी नदी गाळमुक्त झाल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गाळ उपशामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.