मुंबई:- वाढत्या अपघाताच्या पृष्ठभूमीवर दुचाकीस्वारांचा हाेणारा मृत्यू आणि गंभीर दुखापतींना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने पावले उचलली आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता सहप्रवाशांनाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. संपूर्ण राज्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती (Helmet Compulsory) करणारे परिपत्रक अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) अरविंद साळवे यांनी काढले आहे.
शहरासह ग्रामीण भागांत माेठ्या प्रमाणावर दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. साेबतच अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला हाेता. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर कारवाईचा आदेश पाेलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पाेलिस आयुक्त व पाेलिस अधीक्षकांना दिला आहे. सोमवार २५ नाेव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना हेल्मेट न घातल्यास पिलियन रायडरवरही कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेटसक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली होती. यात हजारो मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात आली. परिणामी सर्वच महानगरांमध्ये हेल्मेट घालण्याचे प्रमाण वाढले. त्यापाठोपाठ आता मोटारसायकलस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशांना (पिलीयन रायडर) हेल्मेट सक्तीने घालण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत.
मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवित असताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर वाहतूक प्रकरणे दाखल होतात. त्याकरीता वापरण्यात येणाऱ्या ई-चालान मशिनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलियन रायडर यांच्यावरील कारवाई वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये होत असल्याने कारवाईची वेगळी माहिती मिळत नव्हती. आता ई-चालान मशिनमध्ये बदल केले जात आहे. यापुढे विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलियन रायडर अशा दोन हेडखाली कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.