न घाबरता महिलांनी तक्रारी मांडण्याचे अध्यक्षांचे आवाहन.
रत्नागिरी, दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणी महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर दि. १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व विधी यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.