कॅन्सरचं वाढतं सावट…. आपल्या सवयीच ठरत आहेत मृत्युलोकाचं दार!

0
44

लेखक:- हृषिकेश विश्वनाथ सावंत, MSc Zoology, M.A. Communication & Journalism, M.A. Political Science, 9145680102.

विशेष मार्गदर्शन:- जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. भास्कर जगताप, डॉ. अंकुश शिरसाठ, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी.

गेल्या काही वर्षांत भारतात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामागे केवळ अनुवांशिकता नाही, तर आपल्या बदलत्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयीही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. डॉक्टर्सच्या माहितीनुसार, काही सामान्य वाटणाऱ्या सवयी आपल्याला हळूहळू कॅन्सरच्या दारापर्यंत पोहोचवत आहेत.

कॅन्सरचे प्रमुख कारण म्हणजे अनुवांशिकता, मात्र त्याचबरोबर ताण-तणावाचे वाढते प्रमाण देखील शरीरातील पेशींवर परिणाम करून कॅन्सरला निमंत्रण देते. रोजच्या वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे, रस्त्यावरील चहा-कॉफी सारखे गरम पेये प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये घेणे, प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये अन्य गरम पदार्थ घेणे हे प्रकार शरीरात हानिकारक रसायनं जमा करतात. याशिवाय, प्लास्टिक थैली (polythene) मध्ये गरम पदार्थ पार्सल करून मागवणे ( उदा: चहा, कॉफी, भाजी, सूप इत्यादी), निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिक कंटेनरमध्ये गरम अन्न खाणे, जसे की भात, चपाती, पराठा, पिझ्झा इत्यादी शरीरावर विषारी परिणाम करतात.

काही लोक अजूनही गुटखा, सिगारेट, बीडी, जर्दा, मिश्री यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, जे तोंडाच्या आणि फुप्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहेत. बदलती जीवनशैली – जसे की व्यायामाचा अभाव, जंक फूडचे वाढते सेवन, मानसिक ताण, कमी झोप आणि पोषणमूल्ये नसलेला आहार, यांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि कॅन्सरचा धोका वाढतो. विशेषतः इंजेक्शन्सने वाढवलेल्या ब्रॉइलर चिकनचा नियमित वापर हा देखील आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामध्ये असलेले कृत्रिम हार्मोन्स शरीरात असंतुलन निर्माण करतात.

आरोग्य अधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की वेळेवर वैद्यकीय तपासणी न करणे ही देखील एक मोठी चूक ठरते. कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला, तर त्यावर उपचार शक्य आहे. मात्र वेळ निघून गेल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते.

आपण स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. गरम अन्नासाठी स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करावा, व्यायामाला वेळ द्यावा, संतुलित आहार घ्यावा आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी योग व ध्यान करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांपासून कायमची सुटका करून घ्यावी.

सर्व स्त्रियांनी 30 वर्षानंतर दरवर्षी दोनदा( प्रत्येक 6 महिन्यातून एकदा) आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन cervical cancer आणि breast cancer साठी आपली तपासणी करून घ्यावी.( कुठलेही लक्षण किंवा त्रास नसला तरीही), तसेच 30 वर्षांवरील सर्व स्त्रियांनी नियमितपणे आपल्या घरी आपल्या स्तनांची स्वतः तपासणी करावी (आरशाच्या मदतीने आणि स्वतः स्पर्श करून) आणि गाठ, किंवा स्तनांच्या आकारात बदल, किंवा रक्त निघणे, पू निघणे, निप्पल मधे बदल इत्यादी कोणतेही लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे आव्हान जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी तर्फे करण्यात येत आहे.

कॅन्सर ही केवळ शरीराची नव्हे तर समाजाचीही लढाई आहे. आज आपण आपल्या सवयी आणि जीवनशैली बदलून उद्याचा आनंद निश्चित करू शकतो. कारण आरोग्य हाच खरा खजिना आहे, जो काळजीपूर्वक जपणं हीच शहाणपणाची निशाणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here