रत्नागिरी, २० जून – रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडीवर प्रस्तावित पुलाच्या माती परीक्षणाचे काम आज (शुक्रवार) पासून पोलिस बंदोबस्तात सुरू होणार आहे. स्थानिक पातळीवर या कामाला विरोध होण्याची शक्यता असल्याने ठेकेदाराच्या मागणीनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सागरी महामार्गासाठी नव्या पुलांची व उड्डाणपुलांची मंजुरी दिली आहे. काळबादेवी खाडीवर उभारल्या जाणाऱ्या पुलासाठी काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांशी सकारात्मक बैठक झाली होती. मात्र, नंतर विरोध वाढू लागला असून, उड्डाणपुलाऐवजी किनारपट्टीवरून मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज सुरू होणाऱ्या माती परीक्षणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.