Monday, December 23, 2024

Top 5 This Week

Related Posts

१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद?

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिका हद्दीत समावेशास ऐरोलीतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ही भूमिका मांडल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात काढलेल्या एका आदेशानुसार या गावांच्या नियोजनाचे अधिकार नवी मुंबई महापालिकेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची भेट घेत या गावांमध्ये एक रुपयाचाही खर्च केला तर याद राखा, असा इशारा नाईक यांनी दिल्याचे समजते. विशेष म्हणजे, ‘माझी ही भूमिका तुमच्या मुख्यमंत्र्यांना कळवा’, अशा शब्दांत नाईकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बजावल्याने १४ गावांच्या समावेशावरून नाईक-मुख्यमंत्री पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्च २०२४ मध्ये घेतला. एकेकाळी वाढीव मालमत्ता कराच्या प्रश्नावर नवी मुंबई महापालिकेतून बाहेर पडल्याने ही गावे समस्यांच्या गर्तेत सापडली होती. यातून बोध घेऊन या गावातील ग्रामस्थांनी आमच्या गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा अशी मागणी लावून धरली होती. ती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारने शासन निर्णय काढून पूर्ण केली. या निर्णयामागे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आग्रह महत्त्वाचा ठरला.

नवी मुंबई हे नियोजित शहर आहे. महापालिकेच्या मालकीचे स्वत:चे धरण आहे. इथली कचराभूमी ही उत्तम दर्जाची आहे. त्यामुळे १४ गावांचा निर्णय राज्य सरकार घेत असेल तर तेथील पायाभूत सुविधा, बेकायदा बांधकामांचे उच्चाटन याची तजवीज सरकारनेच करावी. मगच यासंबंधी निर्णय घेणे नवी मुंबईकरांसाठी हितावह ठरेल.

Eknath Shinde Vs Ganesh Naik in Navi Mumbai.

Popular Articles

error: Content is protected !!