रत्नागिरी | हृषिकेश सावंत:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) दक्षिण रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी मुख्याधिकारी यांना ३० जून रोजी निवेदन देण्यात आले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाजवळील रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून, विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी अभाविपने निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, पुढील ७ दिवसांत संबंधित यंत्रणेकडून योग्य कार्यवाही न झाल्यास अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
दरवर्षी सदर रस्त्याची परिस्थिति ही दयनीय असते. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
अभाविप आता अॅक्शन मोडमध्ये आली असून, प्रशासनाच्या झोपलेल्या यंत्रणेला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थीहितासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धार अभाविपने व्यक्त केला आहे.
अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समाज व विद्यार्थी हितासाठी संघर्षशील असून, आंदोलने व उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आलेली आहे. रत्नागिरीमध्येही अभाविपने याआधी अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या मार्गी लावली आहेत, यामुळेच या मागणीची दखल घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.