आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘भारतीय नौदल दिन’ आनंददायी वातावरणात साजरा.

0
30

देवरुख:- छत्रपती शिवाजी महाराजांनी १७व्या शतकात आरमाराचे युद्धकालीन महत्त्व ओळखून योजनाबद्ध आरमाराची बांधणी केली आणि तत्कालीन सागरी सीमेचे संरक्षण करण्याची तजवीज केली. शिवरायांचे हे भारतीय इतिहासातील आगळे वेगळे कर्तुत्व आहे, यासाठीच छत्रपती शिवरायांना भारतीय नौसेनेचे आद्य प्रवर्तक मानतात. या आठवणींना उजाळा मिळण्याची निमित्त होते, ते म्हणजे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय नौदल दिनाचे.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारक स्थळी २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी, रत्नागिरीचे इन्स्ट्रक्टर हेमंत सायनी, सहकारी अजिंक्य देवळेकर, महाविद्यालयाच्या नेव्हल एनसीसी युनिटचे सब लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये आणि एनसीसी युनिटच्या ५० कॅडेटनी मानवंदना दिली. यानंतर हेमंत सायनी आणि प्रा. उदय भाट्ये यांनी उपस्थित कॅडेटना मार्गदर्शन केले.

कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. सीमा शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय नौदलातील स्त्रीशक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शेट्ये यांनी ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्त्रियांच्या सक्रिय सहभागा आढावा घेतला. दुसऱ्या महायुद्धातील आझाद हिंद फौजेतील राणी झाशी रेजिमेंट मधील महिला सैनिकांचे कार्यकर्तृत्व विशद केले. नौदलात स्त्री कमांडर ही रँक पहिल्यांदा मिळवणाऱ्या डॉ. बार्बरा घोष, सब लेफ्टनंट शुभांगी स्वरूप, व्हॉइस ऍडमिरल सर्जन शैला मथाई, लेफ्टनंट नवज्योत कौर, लेफ्टनंट करिष्मा शिरवळे, लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी यांची यशस्वी कारकीर्द उपस्थितितांसमोर मांडली. नौदलातील कार्यरत महिलांच्या विविध नाविक सागरी परिक्रमाबाबतची माहितीही याप्रसंगी दिली.

प्रा. धनंजय दळवी यांनी ‘नौदलाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर माहिती देताना, भारतीय नौदलाचा इतिहास व महत्त्व, नौदलाची स्थापना, नौदलाचे ब्रीदवाक्य, भारतीय नौदलाचे तळ व फ्लिटस स्टेशन्स यावर प्रकाश टाकला. भारतीय नौदल दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना, सद्यस्थितीतील नौदलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक शस्त्रसज्ज युद्धनौका व पाणबुड्या, कर्मचारी संख्याबळ, नौदलाची अलीकडच्या काळातील आत्मनिर्भरता याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, राहुल फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here