चिपळूणकरांचे स्वप्न ‘ग्रॅव्हीटी’ मुळे सत्यात उतरणार.

0
31

चिपळूण:- चिपळूण शहरातील बहुचर्चित ग्रॅव्हीटी पाणी योजनेसाठी अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील श्रमगाथा ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात हाेणार असून, मे २०२५ अखेर योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या याेजनेमुळे तब्बल २० वर्षांनंतर चिपळूणकरांचे पाणी याेजनेचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

चिपळूण शहरातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासठी उपाययोजना म्हणून २००४ मध्ये कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हीटी पाणी योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासाठी सुरुवातीला माजी आमदार रमेश कदम यांनी प्रयत्न केले. तत्कालीन पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांनी कोळकेवाडी धरणातून पाणी उचलण्यास मान्यता दिली. तसा कायदेशीर करार चिपळूण नगरपरिषद व पाटबंधारे विभागात करण्यात आला.

या योजनेसाठी सर्वेक्षण करून तसा अहवाल संबंधितांकडे पाठवण्यात आला. तसेच या योजनेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सोपविण्यात आली. योजनेसाठी आवश्यक साठवण टाकी व त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यानंतर ही याेजना रखडली हाेती. आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर योजनेच्या १६० कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळाली.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधीच या योजनेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीनंतर नाशिक येथील ठेकेदार कंपनीने पुणे येथील जिओ स्पेशल्स कंसाल्टन्सीच्या मार्गदर्शनाखाली कामाची तयारी सुरू केली आहे. कोळकेवाडी धरणाच्या आऊटलेटपासून खेर्डी येथील नवीन साठवण टाकीपर्यंत पाइपलाइन टाकण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा सल्ला घेतला जात आहे. ही याेजना लवकर पूर्ण हाेण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले व प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here