चिपळूण:- राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख श्री शरद पवार हे पक्षाला खिंडार पाडणाऱ्याना खिंडीत गाठण्यासाठी महाराष्ट्र भर दौरा करीत आहेत. चिपळूण सभेच्या एक दिवस आधी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील हवामानाचा अंदाज तपासण्यासाठी श्री शरद पवार दाखल झाले आहेत. एकेकाळचे निष्ठावंत आज पाठ फिरवून उभे आहेत त्यांच्याकरीता हा पहिलवानी डाव म्हणजे पेचप्रसंग आहे. यात कोण कोण चितपट होणार? हा औस्तुक्याचा विषय आहे . पंचाहत्तरी उलटलेल्या उमद्या नेत्याने पुनः पक्षबांधणी करुन राजकीय विश्लेषकांना आपण राजकारणातील चाणाक्ष चाणाक्य आहोत हे पटवून दिले आहे.
या सभेत श्री पवार काय बोलणार? कार्यकर्त्यांना कोणत्या सुचना करणार? विरोधकांना कोपरखळ्या, कानपिचक्या की आणखी काही देणार याकडे तमाम जनसामान्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही सभा चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात, बहादूर शेख नाका येथे होणार आहे. वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट चे संस्थापक रमेश बबन यादव यांच्यावर पवार यांनी विश्वास दाखवून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जाहीर घोषणा केली आहे.श्री यादव यांनी संगमेश्वर चिपळूण येथील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी श्वेत क्रांतीचे स्वप्न दाखवले. ओस पडलेले गोठे दुभत्या जनावरांनी पुन्हा भरू लागले आहेत. युवक, महिला, पुरुष शेतकरी हा सुखद अनुभव अनुभवत आहेत.
ही सभा राजकीय नेते, कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांची उत्कंठा वाढवीत आहे.