
काँग्रेस ने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!
लांजा:- शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी झालेल्या वाकेड जिल्हा परिषद गटातील सभेला रत्नागिरी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी संबोधित केले. या सभेमध्ये बोलत असताना गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या कार्याचा आढावा घेत अविनाश लाड यांनी विरोधकांवर कडक भाषेत निशाणा साधला. ‘२०१९ ला झालेला आमचा निसट्टा पराभव आम्ही भरून काढून विरोधकांच्या मानेवर पाय दिल्याशिवाय शांत बसणार नाही’, असा हुंकार त्यांनी सभेत भरला. सभेदरम्यान अचानक घालवल्या गेलेल्या विजेवरून ‘जरी तुम्ही आमच्या ‘लाइट्स’ घालवल्या तरी अविनाश लाड व काँग्रेसचा आवाज जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा हे आम्हाला चांगलंच माहिती आहे’, अशा कडक भाषेत त्यांनी विरोधकांना ठणकावलं. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साह संचारला होता. लांजा कॉँग्रेसचे तालुका प्रमुख बब्या हेगिष्टे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत सभा गाजवली.
या मेळाव्यात महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महंमद पावसकर यांनी हा ‘कार्यकर्ता मेळावा’ संपन्न करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी याप्रसंगी काँग्रेसचे लांजा तालुकाप्रमुख बब्या उर्फ श्रीकृष्ण हेगिष्टे, लांजा शहरप्रमुख रवींद्र राणे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महंमद पावसकर, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, महिला तालुकाध्यक्ष धनीता चव्हाण, युवक काँग्रेस तालुकाप्रमुख प्रतिक खरात, सेवा दल तालुका अध्यक्ष आदम रखांगी , उप तालुकाध्यक्ष मकरंद जोशी , युवक कॉँग्रेस विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष प्रथमेश बोडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते आबीद काझी, प्रशांत शेट्ये, विलू बेर्डे, अमोल लाड, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व ग्रामस्थ, हितचिंतक उपस्थित होते.