स्थानिक ग्रामस्थांनी काम रोखले मात्र सुरुंग लावण्याचे काम सुरु.
संगमेश्वर:- मिऱ्या नागपूर चौपदरीकरण काम नाणीज ते आंबा घाट मार्गांवर वेगात सुरु आहे. आंबा घाटामध्ये असणाऱ्या दक्खन गावात डोंगर कटाई काम सुरु आहे. याठिकाणी असणाऱ्या कातळ दगडावर भूसुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरु आहे. यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत आहे. हे गाव दरड क्षेत्र म्हणून ओळखले जाते. 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी या गावात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्याचबरोबर एका घरावर पूर्ण दरड आल्याने मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने घरात कोणी नसल्याने लोक बचावले होते. त्यामुळे अशी गंभीर परिस्थिती असताना देखील या ठिकाणी धोकादायकरित्या सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरु आहे.
यामुळे मोठमोठा आवाज आणि दगड सर्वत्र उडत आहेत. त्याचबरोबर शाळा देखील जवळ आहे.स्थानिकांनी याठिकाणी काम देखील रोखले होते. त्याचबरोबर या क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांच्याकडे देखील निवेदन देण्यात आले आहे.तरीदेखील या ठिकाणी सुरुंगसाठी खड्डे मारण्याचे काम सुरु आहे. आंबा घाटात सुद्धा अनेक ठिकाणी अशाप्रकारे सुरुंग लावून दगड फोडण्यात आले आहे.त्यामुळे हायवे प्रशासन आणि ठेकेदार कंपनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे जरुरी आहे अन्यथा भविष्यात धोका संभवू शकतो.