अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी दारूबंदी कमिटीची स्थापना ; कमिटीच्या अध्यक्षपदी प्रथमेश गोरे!
लांजा :- लांजा तालुक्यातील (Lanja) वाघरट-वाडीलिंबू ग्रामपंचायत हद्दीत दारू व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी अनेक व्यक्तींनी इच्छा प्रदर्शित करत अर्ज केले होते. मात्र गावातील महिला वर्गाचा या दारू व्यवसायाला परवाने देण्यास विरोध असल्याने दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत (Gramsabha) दोनशे महिला मतदारांनी एकत्र येत दारु परवान्यांना मंजुरी देण्याच्या ठरावाला विरोध करत दारूबंदी ठरावाच्या बाजूने उभे राहत गावात दारूबंदी ठराव मंजूर करून घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायत हद्दीत दारू विक्रीचा परवाना कोणालाही देता येणार नाही.
याबरोबर गावात चाललेली अवैध दारू विक्री बंद (Liquor Ban) करण्यासाठी ग्रामसभेने गावातील महिला – पुरुषांना एकत्र करत दारूबंदी कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीच्या अध्यक्षपदी प्रथमेश गोरे यांची निवड केली असून येत्या आठ दिवसात गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात येईल असा निर्धार कमिटीने केला आहे. वाघरट-वाडीलिंबू (Waghrat Wadilimbu) येथील महिलांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीतून स्वागत व कौतुक केले जात आहे.