देवगड:- महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मा. श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/कार्यालये, इ. मध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उमेदवार दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असल्यास रू. 6000/- विद्यावेतन, उमेदवार औ.प्र.संस्था अथवा पदविका प्रशिक्षण उत्तीर्ण असल्यास रू. 8000/- विद्यावेतन, उमेदवार पदवीधर अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास रू. 10000/- विद्यावेतन महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड या संस्थेमध्ये दि. 25.09.2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मेळाव्यासाठी देवगड तालुक्यातील विविध कंपन्या, आस्थापना यांचे नियोक्ता उपस्थित राहणार आहेत. तरी देवगड तालुक्यातील बेरोजगार उमेदवारांनी सदरील मेळाव्यासाठी सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावयाचे आवाहन श्री. एस. एल. कुसगांवकर, प्राचार्य औ.प्र.संस्था, देवगड यांनी केले आहे.