कोकणातील अपारंपारिक ऊर्जेच्या संधींवर रत्नागिरीत बैठक.
रत्नागिरी:- केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आज रत्नागिरी येथे आले असता डॉ. ज. शं. केळकर मेमोरियल फाउंडेशनच्या डॉ. ऋषिकेश केळकर, अनिरुद्ध फळणीकर, अनिश पटवर्धन, टाईम्स विश्वनाथ न्यूज चे संपादक हृषिकेश सावंत यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली तसेच अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रासंबंधी विविध योजनांविषयी चर्चा केली. रत्नागिरी व कोकणच्या दृष्टीने आपरंपारिक ऊर्जा क्षेत्राचा विस्तार व विकास होण्यासंबंधी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
डॉ. ज. शं. केळकर मेमोरियल फाउंडेशन रत्नागिरी व कोकणातील सामाजिक, सार्वजनिक आरोग्य व कौशल्य विकास या क्षेत्रात भरीव काम करत आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी डॉ. ज. शं. केळकर मेमोरियल फाउंडेशनच्या कार्याची माहिती मंत्रीमहोदयांना दिली.
फाउंडेशनने मंत्रीमहोदयांसमोर कोकणातील अपारंपारिक ऊर्जा विकासासाठी ठोस योजना मांडली. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या संधींवर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी व कोकणातील स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, हरित विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
कौशल्यविकास व ऊर्जा क्षेत्रातील भागीदारीद्वारे सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधता येईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. मंत्री श्रीपाद नाईक यांनी फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
श्रीपाद नाईक यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले, सामाजिक कार्याविषयी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सहकार्याचे आश्वासन दिले.