रत्नदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान आंदोलन करणार.

0
10

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन सादर.

रत्नागिरी:- दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरीतील गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. रत्नदुर्ग किल्ल्यावर होत असलेल्या अश्लील कृत्ये, मद्यपान, व प्रेमीयुगुलांच्या रात्री अपरात्रीच्या फेर्‍यांमुळे किल्ल्याच्या पवित्र वास्तूला होणाऱ्या अपमानास आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी साहेबांनी गड संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले व सविस्तर चर्चेसाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे सांगितले.

प्रमुख मुद्दे आणि उपाययोजना

  1. दारू व व्यसनाधीन व्यक्तींवर प्रतिबंध
    किल्ल्याच्या पवित्र वास्तूत होत असलेल्या अश्लील व व्यसनाधीन प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नियमित पोलीस गस्त व कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
  2. प्रेमीयुगुलांच्या अयोग्य वागणुकीस आळा घालणे:
    रात्री अपरात्री किल्ल्यावर होणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या फेऱ्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
  3. माहिती व सूचना फलक लावणे:
    गडकिल्ल्याच्या परिसरात गडाचा ऐतिहासिक वारसा व नियमांचे महत्त्व पटवून देणारे सूचना फलक लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
  4. गडाच्या बुजांना व वास्तूंना हानी थांबवणे:
    झाडे व झुडपांमुळे बुरुज व ऐतिहासिक वास्तूंना होणारे नुकसान रोखण्यासाठी नियमित स्वच्छता व संवर्धनाचे उपक्रम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

या प्रसंगी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपेश वारंग, महिला अध्यक्ष मानसी चव्हाण, संपर्क प्रमुख तन्मय जाधव, गडकिल्ले सेवक दीपक रेवाले, राजा किर, विजय कळंबटे, सचिन कळंबटे, किर्ती धामणे, शीतल श्रीखंडे, दीपक कडोलकर, शुभांगीनी जाधव, शशिकांत जाधव, स्वयम नायर, शिवसेना शिंदेगट महिला जिल्हा संघटक श्रीमती संध्या कोसुंबमकर यांसह अनेक गावकरी व संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जयदीप साळवी, धर्म जागरण दक्षिण रत्नागिरी संयोजक विजय यादव, हिंदू महासभेचे अध्यक्ष श्रीकांत मराठे, व इतर मान्यवरांनी या कार्यास पूर्ण पाठिंबा दर्शविला. या संदर्भात संस्थेचे संस्थापक श्री योगेश सोनवणे यांनी कडक इशारा दिला आहे की, “सदर विषयावर योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून जनआंदोलन उभे केले जाईल आणि ते रत्नागिरीकडे वळविण्यात येईल.”

ही बैठक रत्नदुर्ग किल्ल्याच्या पवित्र वास्तूच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, यासाठी लवकरच अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here