३७५ वर्षांची परंपरा असलेल्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला प्रारंभ; संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, संगमेश्वर, साखरपा येथील बाजारपेठा सजल्या.
देवरूख:- रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशोत्सवाला संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथून आज बुधवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ झाला आहे. देवरूख शहरातील दोन मानाच्या गणरायांचे आज बुधवारी सकाळी वाजत-गाजत व मोरया रे मोरया.. गणपती मोरया… गणपती बाप्पा मोरया.. मंगलमुर्ती मोरया या जयघोषात आगमन झाले. शहरातील सुमारे ३७५ वर्षांची परंपरा असलेल्या पंतजोशी यांच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

देवरूख शहरातील श्रीकांत जोशी व पंतजोशी यांच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला (Ganeshotsav) भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरूवात होते. या दोन मानाच्या गणरायांचे बुधवारी वाजत-गाजत आगमन झाले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील भोंदे चित्रशाळेतून चौसोपी वाड्यातील घोड्यावर बसलेली गणेशमुर्ती डोक्यावरून आणली गेली. या गणेशमुर्तीच्या बाजूला रिध्दी-सिध्दी व भालदार-चोपदार असतात. या गणेशमुर्तीचे शिवाजी चौक, बसस्थानक, बाजारपेठ, माणिक चौकमार्गे चौसोपी वाड्यात वाजत-गाजत आगमन झाले. तत्पुर्वी श्रीकांत जोशी यांच्या माणिक चौक येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. या दोन्ही गणेशमुर्तींची विधिवत पुजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
देवरूख (Devrukh) येथील गेली ३७५ वर्षे या उत्सवाची ही परंपरा कायम आहे. सर्वच ठिकाणी गणेशमूर्तीची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठापना होते. मात्र श्रीकांत जोशी आणि चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरूवात होते. त्यामुळे या उत्सवाने रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गणेशोत्सवाची सुरवात होते. बुधवारी या दोन्ही मानाच्या गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाले. यावेळी वातावरण भक्तीमय झाले होते. चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. या गणेशोत्सवाला बुधवारी प्रारंभ झाला आहे. नियमीत गणेशोत्सवाला दि. ७ सप्टेंबरला सुरूवात होणार असल्याने गणेशोत्सवासाठी तालुक्यातील देवरूख, संगमेश्वर, साखरपा, आरवली येथील बाजारपेठा साहित्यांनी सजल्या आहेत. तर चाकरमानीही गावागावात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.