रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र ही संस्था गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, विशेषतः ग्रामीण भागातील वंचित व गरिबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी विशेष कार्य करीत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे हे महाराष्ट्रभर दौरे करत सामान्य घरातील मुलं-मुली कशाप्रकारे सरकारी सेवेत नोकरी मिळवतील यासाठी ठिकठिकाणी मोफत शिकवणी व मोफत हॉस्टेल व्यवस्थेची सोय करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णवाहिकेंची कमतरता पाहत मोफत रुग्णवाहिकेंची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे काम कोकणात विस्तारण्याच्या दृष्टीकोनातून रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे, जांभारी, सतकोंडी, कांबळेलावगणं, मिरवणे, वाटद, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ, आगरनरळ, चाफे, खालगाव, देवूड, मांजरे, बोंडे, नारशिंगे, वेतोशी व कोतवडे या गावांमध्ये ‘जिजाऊ’ च्या शाखांचे उद्घाटन दि. ७ ऑक्टोबर रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शाखांच्या उद्घाटनावेळी विविध गावांतील ग्रामस्थांनी श्री. निलेश सांबरे यांची भेट घेतली व ‘जिजाऊ’ च्या माध्यमातून ते करत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थांचा विशेष उत्साह पाहण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण, रत्नागिरी जिल्हा प्रमुख – श्री प्रथमेश गावणकर, कायदेशीर सल्लागार ॲड . महेंद्र मांडवकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष – श्री मंदार नैकर, रत्नागिरी युवा तालुका अध्यक्ष श्री अक्षय बारगुडे, लांजा तालुकाध्यक्ष श्री. योगेश पांचाळ तसेच सहकारी, हितचिंतक व गावातील ग्रामस्थ, तरुण- तरुणी, महिला वर्ग, विद्यार्थी व पालक वर्ग, गावकरी मंडळी, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
